loading

महंत प. पू. सद्गुरु गावडेकाका महाराज.....
[एक अलौकिक सत्पुरुष]

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा ।

या उक्तीप्रमाणे २००७ सालापासून लोकांची तन, मन, धन लावून निःस्वार्थी भावनेने समाजाची अहोरात्र सेवा करणारे, निराधारांना आधार देणारे, नैराश्येतून आशेचा आत्मविश्वासाचा दीप लावणारे, असाध्य वेदनांना दूर करणारे, कष्टातून मोती पिकविणारे, व्यसन मुक्तीकरिता भरीव योगदान देणारे अशा आणखी कितीही उपमा दिल्या तरी कमीच वाटणारे आपले सर्वांचे लाडके प. पू. सद्‌गुरु श्री गावडे काका महाराज !

सागराची खोली मोजता येत नाही की आकाशाला गवसणी घालता येत नाही. त्याचप्रमाणे वंदनीय काकांच्या कार्याचे वर्णनही शब्दात करता येणे कठीणच! परंतु या कार्याच्या कक्षा आता सर्वदूर पसरल्या आहेत. कोकणात अध्यात्माचा झेंडा फडकविणाऱ्या या कोकणच्या सुपुत्राने 'जनकल्याण महायाग' २५ डिसेंबर २०१६ ला आयोजित करून त्यामध्ये संपूर्ण भारत देशामधील, साधु, महामंडलेश्वर, तपस्वी महंतांचे पाय या कोणकच्या पवित्र भूमीला लावून कोकणातील लोकांना त्यांचे आशीर्वाद देऊन कणकवली या प. पू. भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये इतिहास घडविला.

वंदनीय काकांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांच्या कार्याला सलाम करून्त अखिल भारतीय साधु समाज आखाडा यांच्यावतीने श्री श्री महंत १०८ मठाधिश प. पू. सद्गुरु गावडे काका महाराज ही पदवी बहाल करण्यात आली. वंदनीय काका हे कोकणचे पहिले सुपुत्र आहेत जे महंत पदाला पोहोचले आहेत. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. वंदनीय काका हे केवळ अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. ते नेहमी नव्या व चांगल्या गोष्टींचा शोध घेत असतात.

प. पू. सद्‌गुरु गावडे काका यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते अध्यात्मात उच्चस्थानी असलेल्या काकांच्या ठायी मी पणाला तीळमात्र थारा नाही. ते प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकत असतात. काका निंदकालाही आपला गुरु मानतात. परंतु प्रत्येकाने काकांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले तर नास्तिकही अस्तिक बनेल. काकांकडे आलेला प्रत्येक मनुष्य नवीन उमेद, नवीन आत्मविश्वास घेऊनच बाहेर पडतो. काका आयुष्यात जे जगले, जे अनुभवले त्यावरुन आपल्या सेवकाला मार्ग दाखवितात आणि त्याला जोड असते ती श्री स्वामी समर्थ न्यासाची !

मठाधिपती प. पू. गावडे काका महाराजांनी आपल्या सद्‌गुरु भक्त सेवान्यास या संस्थेतर्फे विद्यार्थी दत्तक योजना, समाजातील विविध स्तरातील, धर्मातील गरीब-गरजू व आपास्त कुटुंबासाठी निराधाराना आधार ही योजना राबविली. अनेक गरजूंना वेळोवेळी आर्थिक मदत केली जाते. माड्याची वाडी या आपल्या कर्मभूमीमध्ये 'निसर्गोपचार केंद्र' स्थापन करून अनेक दुःखीकष्टी रुग्णांची सेवा काका स्वतः करत असतात. गाक्हाटीच्या माध्यमातून काकांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. वेगवेगळ्या क्षेत्रातील सामान्यांपासून ते अनेक बुद्धीजीवीच्या कलागुणांना, विचारांना वाव देण्यासाठी "स्वामीबोध" मासिकाची निर्मिती केली. समाजाच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुरु केली आहे. या सर्व माध्यमातून सर्वांचे जीवन प्रकाशमय करण्याचा ध्यास काकांनी घेतलेला आहे. आकाशाला गवसणी घालता येत नाही, पर्जन्यधारा मोजता येत नाहीत त्याप्रमागो काकांच्या अफाट कार्याचा विस्तार शब्दांमध्ये सांगता येत नाही. अशा या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम !

निःस्वार्थ जीवनाचा आदर्श
[ सद्गुरु गावडेकाका महाराज ]

ज्यांचे वयाच्या सातव्या वर्षी बालपण संपले. तारूण्य अवस्थेत कष्टाच्या धगधगत्या निखाऱ्यात शरीर होरपळले. भातुकलीच्या खेळाप्रमाणे अवघ्या ४ वर्षातच संसार गळून पडला. पण परमेश्वराबरोबरचा परमपूज्य सद्‌गुरू श्री गावडेकाका महाराजांसारखा सत्पुरूष घडला. शैले न माणिक्यं न गजे गजे । साथयो न हि सर्वत्रं चंदनं न वने वने ।

प्रत्येक शिंपल्यात माणिक आढळत नाहीत.प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती नसंतो. चंदन प्रत्येक वनात असतेच असे नाही. त्याचप्रमाणे सज्जन जागोजागी मिळत नाहीत. देवाने मानवाची निर्मिती केली त्या मागचा हेतू एकच त्याने भगवंतांना जाणावे, ओळखावे परंतु जीवाला आत्मबुदुधीचे विस्मरण झाले आणि देहबुद्धी दृढ झाली. जीव संसार सुखात रमून बसला. तेव्हा षड्ऐश्वर्याने मांडीत असलेल्या परब्रह्माला परम सद्‌गुरू रूप धारण करून जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून द्यावी लागली. हेच परमसद्गुरू रूप आम्हा सर्वसामान्य जनांना मठाधीपती परमपूज्य सद्‌गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या रूपाने लाभले आहेत. हे आमचे परमभाग्यच आहे. या माऊलीरूपी सद्‌गुरूंच्या चरणी अनुचा प्रेमभरला नमस्कार.

संत सहवास सद्‌गुरूंची कृपादृष्टी होण्याकरीता ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे 'बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी' असणे आवश्यक असते. मुळात सत्पुरूष जन्माला येण्याकरीता परमेश्वराचा आशीर्वाद असणे आवश्यक असते. परंतु असा आशीर्वाद पूर्व पुण्याच्या साठ्याशिवाय लाभत नाही. पुण्यांचा साठा हा अनेक पिढ्यांनी काया, वाचा, मन हरीसेवेत झिजवल्यावरच मिळतो. कारण आपण जे पेरतो तेच उगवते. म्हणून त्यासाठी तपश्चर्याही घडलीच पाहिजे. दशरथाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता

तेव्हा राम जन्मला. अंजनीने घोर तपस्या केली तेव्हा हनुमान जन्मास आला. या कलियुगात तप, योग, यज्ञ शक्य नसले तरी सुकन्या व सुपुत्र जन्मास येण्यास हरिची उपासना व त्यायोगे जनसेवेच्या पुण्याचा साठा असणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे सत्शिल, हरिभक्तीत लीन राहून जनांना उपासनेचा मार्ग दाखवत जनसेवेत सदैव तत्पर असलेली सामान्य कुटुंबीय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथील गावडे कुटुंबीय होय. ज्याची ग्रामदैवत कलेश्वर आणि कुलदैवत श्री देव गावडेबाबांवर दृढ विश्वास आणि अतूट श्रद्धा मनात बसलेली होती अन् आजही तितकीच आहे. गावडे घराणे म्हणजे गावातील प्रमुख मानकऱ्यांचे घराणे होय. त्यामुळे गावटी हा या कुटुंबाचा एक जिव्हाळ्याचा विषय होय. गाव, मंदिर, गावहऱ्हाटी या सर्वच कामकाजात हे घराणे नेहमीच कर्तव्यदक्ष असायचे. भिकाजी राघो गावडे (वंदनीय गावडे काकांचे पणजोबा) हे तर गावहऱ्हाटी या विषयातील प्रमुख आणि जेष्ठ जाणकार म्हणूनच संबोधले जात.

गावटी विषयक गाडा अभ्यास असलेल्या भिकाजी गावडे यांना गावात एक वेगळाच मान होता. त्यांनी गावहऱ्हाटीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकांची सेवा केली, त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या. भिकाजी गावडे यांनी चालवलेल्या या गावटी परंपरेचा वारसा पुढे त्यांचा मुलगा राघो भिकाजी गावडे (वंदनीय गावडे काकांचे आजोबा) यांच्याकडे आला. वडिलांनी पेरलेल्या बिजाचे रोप आता बहरण्याची जबाबदारी आता राघो गावडे यांच्यावर आली. त्यांनी गावटी मर्यादेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविले परंतु त्याही पलीकडे जाऊन लोकांना भाविकांच्या विषयक सेवेत सहभागी करून घेण्यास सुरूवात केली. हेतु एकच होता की गावटीचे कामकाज हे सार्वत्रिक स्वरूपात चालावे. त्यासाठी समाजाने एकसंध व्हावे परंतु समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कितीतरी काळ लोटावा लागला.

राघो गावडे यांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले होते. त्यांच्या या प्रयत्नांना पुढे त्यांचे मुलगे भिकाजी राघो गावडे (वंदनीय गावडे काकांचे वडील) व वामन राघो गावडे (वंदनीय गावडे काकांचे चुलते) यांची साथ मिळाली. आध्यात्मिक, सामाजिक जबाबदारी बरोबरच मनुष्याला प्रांपचिक जबाबदारीही तितक्याच समर्थपणे पेलावी लागते त्यामुळे राघो गावडे यांनी प्रापंचिक जबाबदारी मुलगा भिकाजी गावडे याच्यावर सोपविली. जे नोकरी, घर सांभाळून परंपरागत घराण्याच्या संस्काराप्रमाणे गावहऱ्हाटीच्याही कामकाजात लक्ष देत.

या कार्यापेक्षाही त्यांना कलेची फार आवड होती. ते एक उत्तम हार्मोनियम वादक होते. तसेच त्यांना मूर्तीकलेचीही आवड होती पूर्वीपासून या घराण्याची स्वतःची गणपती शाळा होती. ती आजही त्यांचे काका रामचंद्र राघो गावडे चालवत आहेत. त्यांच्यामुळेच घराण्याच्या आध्यात्मिक संस्काराला कडेची जोड मिळाली. तर वामन राघो गावडे यांनी गावहऱ्हाटीच्या कामाला स्वतःला जणू वाहूंगच घेतले होते. अनेक दुःखी कष्टी लोक त्यांच्या घरी येत श्री देव गावडोबाच्या आशिर्वादाने त्या साऱ्यांचे दुःख त्ते निर्वारत असत. श्री गावडोबाचा हुकुम हा त्यांच्यासाठी अंतीम शब्द असे. त्यांनी आपल्या गोड वाणी व प्रेमळ स्वभावाने अनेकांचे लक्ष गावटीच्या कामकाजाकडे केंद्रीत केले. कदाचित हीच पेरणी पूर्वीची मशागत असेल. अहोरात्र जनांची सेवा करणे हीच या गावडे घराण्यांची तपश्चर्या होती.

अखेर तीन पिढ्यांच्या तपानंतर गावडे घराण्याची सेवा फळाला आली. ३१ मार्च १९६५ रोजी महादेव भिकाजी गावडे नामक तेजस्वी बाळाला माता अनुसुयेने जन्म दिला. हेच तेजस्वी बाळ म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे लाडके मठाधिपती परमपूज्य सद्‌गुरू गावडे काका महाराज होय. कुशाग्र बुद्धीच्या बाल्य अवस्थेतील आपला महादेव (काका) पुढे सत्पुरूष बनून जनांचे कल्याण करेल असे स्वप्नातही आईवडीलांना वाटले नव्हते.

सात्विक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संस्कार पुर्वीपासूनच गावडे कुटुंबियांच्या मुलांवर होते. चार भावंडे, चुलते, त्यांची मुले अशा एकत्रित कुटुंबात काका वाढत होते. त्यामुळे एक तीळ दोघांनी वाटून खावा हे त्यांच्या आईचे संस्कार बालपणातच त्यांच्यावर घडले. घरात अठराविश्व दारिद्रय होते, असंख्य लोक काकांच्या घरी आपल्या व्यथा घेऊन येत. वामन गावडे (काकांचे चुलते) आपल्या परीने त्यांचे प्रश्न सोडवित. परंतु त्यांच्या समोर कधीच आपल्या दारिद्रयााचे प्रदर्शन क करीत नसत. उलट आपल्या एक कप चहाचे दोन कप करून येणाऱ्यांचे स्वागत करीत त्यांची ही निःस्वार्थ वृत्ती बाळ महादेवांच्या रक्तातही उतरली. परिस्थितीने गरीब पण संस्काराने श्रीमंत अशा वातावरणात बाळ महादेव वाढत होता. बाळ महादेवाची चिकित्सक वृत्ती होती. काकांचा हात धरून ते नेहमीच मंदिरात जात. घरीही काकांच्या कामकाजाच्या वेळी बारकाईने लक्ष देत. त्यावेळी एखादा गूढ शब्द आला तर बाळ महादेव - नंतर कुतुहलाने त्याचा अर्थ विचारीत असत. बाळ महादेवाचे हे बुद्धीचातुर्य पाहून आई-वडील व घरातील सर्वच मंडळींना त्याचे कौतुक वाटे. हा हा म्हणता ६ वर्षे बाळ महादेवांच्या कौतुकात कशी निघून गेली तेच कळले नाही. आता वयाच्या ७ व्या वर्षी बाळमहादेवाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार होती. अशातच एक दिवशी एका काळरात्री बाळ महादेवाचे पितृछत्र हरपले. ज्या वयात वडीलांचा हात धरून पाठीवर श्री गणेशाय नमः गिरवायचे त्याच वयात काळाने वडिलांच्या मायेपासून पोरके केले. वैधव्याच्या दुःख वेदनेने टाहो फोडणारी आई, पितृशोक अनावर होऊन आक्रोश करणारी चार भावंडे यांच्या आर्त किंकाळ्या त्या बाल महादेवांनी ऐकल्या आणि तिथेच त्याच्या बालपणाला पूर्णविराम मिळाला.

वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी बाळ महादेवांचे वडील बंधू जनार्दन गावडे यांच्यावर आली त्यांनीच महादेवाला शाळेत दाखल केले. आई अनुसुया मोलमजुरी, भाजीपाला विक्री करून घराला हातभार लावत होती. आता कमावणारे हात दोन आणि खाणारी तोंडे चार अशी घरची परिस्थिती झाली होती. अशातच आपला शिक्षणाचा भार घरच्यांवर येवु नये म्हणुन महादेवांनी इयत्ता पाचवीपासून स्वतःच मजुरी करायला सुरवात केली. ज्या हातात विटी-दांडु किंवा लाकडाची चेंडुफळी हवी होती त्या हातात गवताची भारी व लाकडाच्या मोळ्या आल्या होत्या. तेथूनच त्यांच्या स्वावलंबी जीवनाला सुरवात झाली सातवीपर्यंत शिक्षण त्यांनी माड्याची वाडी येथे पूर्ण केले.

मोठी बहीण बेबी (सौ. वंदना विजय कानडे) हिने त्यांना आपल्या घरी बिंबवणे येथे शिक्षणास नेले. त्यांनी केवळ बहिणीवर अवलंबून न राहता लोकांची मोलमजुरी करणे, घराच्या भिंती उभारण्यासाठी माती वाहून देणे, मेस्त्री काम करणे अशा प्रकारची कष्टाची कामे करून तेथील लक्ष्मी नारायण विद्यालय येथे आपले दहावी पर्यंत शिक्षण घेतले. कष्टाळु जीवनातून शैक्षणिक वाटचाल करत असताना गावहऱ्हाटी, अध्यात्म या विषयीचे आवड तीळमात्रही कमी झाली नव्हती कारण ते त्यांच्या संस्कारात, तन-मनात रूजलेले होते.

पितृछत्र हरवल्यानंतर त्यांनी आपले काका वामन गावडे व दत्ताराम राघो गावडे यांनाच आपले वडिल मानले आणि त्यांनीही वडिलांच्या मायेने या पाचही भावंडांचा सांभाळ केला. महादेवाची अध्यात्माविषयीची रूची पाहून त्यांना फार आनंद होई त्यामुळे ते सतत त्यांना गावहऱ्हाटी, कुलधर्म, कुलाचाराविषयी मार्गदर्शन करीत. बाळपणापासून त्यांनी महादेवाला अध्यात्माविषयी बाळकडू पाजायला सुरवात केली होती. तेच बाळ महादेवाचे पहिले गुरू ठरले. वामन गावडे यांच्याकडून बाळ महादेवाने मार्गदर्शन घेतले आणि त्यांच्या चौदाव्या वर्षी आध्यात्मिक कार्यात पदार्पण केले.

या साऱ्यांबरोबरच त्यांना घराचीही जबाबदारी तितकीच समर्थपणे पेलावयाची होती. संसाराच्या रहाटगाड्यात तापून सुलाखून निघाल्यानंतर जगाच्या अनुभवाचे गाठोडे त्याच्यापाशी साठणार होते म्हणून त्यांच्या काकांनीही त्यांना संसार कार्यासाठी तत्पर केले आणि रामदास लक्ष्मण येरम नावाच्या सद्‌गृहस्थांनी त्यांना मुंबईला नेले. मुंबईसारख्या झगझगत्या मोठ्या शहरात ना रहायला स्वतःचे छत्र होते की दोन वेळेचे अन्न शिजवून देणारी कोणी आपली माणसे. अशातच त्यांनी इतरांच्या घरात राहूनच नोकरी शोधण्यास सुरुवात केली. चकाला अंधेरी येथे एका कंपनीत गतिमान वाहनांचे पार्ट घासण्याची पहिली नोकरी १५ रू. रोजंदारीवर मिळाली. ही त्याच्या आयुष्यातील पहिली नोकरी होती. उदरनिर्वाहासाठी तर नोकरी होतीच परंतु, त्या प्रत्येक कामामध्ये परमात्मा त्यांना एक वेगळाच अनुभव देत होता.

पार्ट घासताना ते तेथे आपल्यातील असे अनेक दुर्गुण असतील त्यांना घासून आपण स्वच्छ, निर्मळ बनलं पाहिजे. या अनुभवातून शहाणे होत असतानाच काही कालावधीनंतर त्यांना त्या कंपनीतून ब्रेक मिळाला. पुढे ते रबर कंपनीत रूजू झाले. तिथेही काही काळानंतर ब्रेक दिला. त्यानंतर दोन वेळा सिल्क मिल मध्ये काम केले. तेथेही ठराविक काळानंतर ब्रेकच मिळाला. त्यानंतर विमानांना जेवण पुरविणाऱ्या एका कंपनीमध्ये काम मिळाले. तेथे मात्र २ वर्षे चांगला जम बसला. पण तेथेही युनियनमुळे कामच बंद पडले. पुन्हा सहारा कंपनी, दोन वेळा वॉशिंग कंपनी नंतर एअरपोर्टवरील एका खाजगी कंपनीत अशा एकामागून एक अनेक नोकऱ्यांसाठी कष्टत राहीले. १-२ वेळा नव्हे तब्बल १० वेळा ब्रेक मिळूनही काका निराश झाले नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले आणि आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले.

ब्रेक नोकरी, पुन्हा ब्रेक पुन्हा नोकरी यामधील काळ मात्र अत्यंत कठीण असे. कधी खिशात एक पैसाही नसे, तर मात्र एका वेळच्या जेवणाची भ्रांत असे. परंतु वंदनीय काकांनी कधीच नशीबाला किंवा देवाला दोष दिला नाही. या मधल्या काळात काका गावी येत गावातील जाणकार भिवा केशव गावडे, गोपाळ देऊ गावडे, कृष्णा गावडे, रामचंद्र संभाजी गावडे, कृष्णा जाधव ( तामसो ताता), राघो गोविंद गावडे, दशरथ लक्ष्मण गावडे, रामचंद्र अर्जुन गावडे, शंकर गावडे ( बाबा फौजदार), गोपाळ भिकाजी गावडे उर्फ बाबा यांसारख्या अनेक व्यक्तींकडून गावटी संबधी मार्गदर्शन घेत व गावच्या कामकाजात हातभार लावत असत.

पुन्हा कुलदैवत गावडोबाचे नाव घेवुन मुंबईकडे प्रस्थान केले आता मात्र त्यांच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. आपण हे गुलामगीरीचे जीवन किती दिवस जगायचे त्यापेक्षा स्वतःचा असा स्वतंत्र व्यवसाय केला तर ? पण व्यवसायासाठी भांडवल कसे उभे करायचे ? अशाच एके दिवशी एका वृत्तपत्रामध्ये २५ ते ३५ टक्के कमिशनवर सेल्समन पाहिजेत ही जाहिरात वाचली आणि या व्यवसायाचा अनुभव घेण्याचे ठरवले. तेथे त्यांनी सेल्समनचे काम स्विकारून घरोघरी साफ-सफाईच्या वस्तु विक्रीचे काम केले. तेथे त्यांना ५०० रू. कमिशन मिळाले. त्या कमिशनची त्यांनी गुंतवणूक करून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली आणि १९९४ साली स्वतःची अमित मार्केटींग कंपनी सुरू केली. येथेच काकांची दूरदृष्टी आणि व्यावसायिक दृष्टिकोन दिसुन येतो. काकांनी जाहिरात वाचून एका कंपनीमध्ये सेल्समन म्हणून कामाला सुरवात केली त्याच काकांनी पुढे ३० टक्के कमिशनने सेल्समन पाहिजे अशी स्वतःच्या कंपनीची जाहिरात दिली.

आता व्यवसायाला हळुहळू स्थैर्यता प्राप्त झाली होती. याचवेळी काकांनी घाटकोपर भटवाडी येथे वीस हजार डिपॉझिट व ५०० रू भाडेतत्वावर दुकान घेतले. त्यात मालवणी खाद्यपदार्थ, कुळीथ पीठ, कुरमुरे लाडु, मालवणी मसाला वगैरे वस्तु ठेवायला सुरवात केली. काही माल बाहेरून विकत घेत तर काही माल काका स्वकष्टाने तयार करीत असत. व्यवसायातील मिळकतीचे चार पैसे आता हाती राहु लागले होते. त्याचवेळी काकांनी घाटकोपर, सिद्धार्थनगर येथे ३०००० रू किंमतीने झोपडपट्टीत पहिली खोली घेतली. मुंबईत बेघर असणाऱ्या काकांना स्वतःच हक्काच घर मिळाल होत. आता उत्साह वाढला होता. पण कष्ट काही थांबले नव्हते. कुळीथ भाजताना हाताला कधी चटके बसत तर कधी दिवसभर थकुन रात्री पॅकींगला बसले की डोळ्यात झापड येई. परंतु काकांनी मुळीच हार मानली नाही. या काळात त्यांना झोपडपट्टीतील लोकांचे फार सहकार्य लाभले. यावेळात काकांनी झोपडपट्टीतील लोकांचे जीवन जवळुन पाहिले आणि अनुभवलेही होते आणि कष्ट करण्याची ताकद दुपटीने वाढली होती कटाचण नक्यातून त्यांनी चाळीस हजार किंमतीची दुसरी खोली खरेदी केली.

व्यवसायात अनुभवाने काका चांगलेच तरबेज होत होते आपल्या मालाला दुकान आणि एका विशिष्ट जागेपुरते मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या भागातील ग्राहक मिळण्यास प्रयत्न केले. मालवणी जत्रोत्सवात आपल्या मालाचे स्टॉल लावायला सुरवात केली. म्हणतात ना बोलणाऱ्याची मातीही खपते पण न बोलणाऱ्याने सोनेही कोणी विकत घेत नाही. त्याप्रमाणे 'एकदा न्हेवा, पुन्हा येवा, पाच रूपयावर पोसाभर लाडू' म्हणत आपल्या मालाला मोठ्या प्रमाणात ग्राहकवर्ग उभा केला. आता व्यवसायाला चांगली गतीही मिळाली होती आणि मिळकतीही वाढली होती. अशातच काकांनी आपल्या मागील दोनही खोल्या विकल्या व घाटकोपर भटवाडी येथे दिड लाख किंमतीची तीसरी खोली विकत घेतली.

आता जीवनाला स्थिरता प्राप्त होत होती. आनंदाचे दिवस पुन्हा येऊ लागले होते. पाट फिरवलेले सुख पुन्हा परतीचा प्रवास करून घरट्यात येत होते. आता खऱ्या अर्थाने गृहस्थाश्रम स्विकारण्याची वेळ आली होती. 'काकांच्या कुटुंबियांनी काकांना विवाहबद्ध करण्याचे ठरविले आणि फेब्रुवारी १९९७ मध्ये काकांचा विवाह ठरला. लग्नाची लगबग सुरू झाली. आप्त इष्ट यांना आमंत्रण देण्याचे कार्य गतीने चालु होते. अशातच काका आपले जवळचे एक स्नेही जे लग्नपत्रिका पाहत त्यांच्या घरी आमंत्रणास गेले. त्या सद्‌गृहस्थांच्या हाती लग्नपत्रिका देत आशिर्वादासाठी काकांनी मस्तक खाली झुकवले तर त्या गृहस्थाच्या तोंडून शब्द बाहेर पडले "ही मुलगी तुमची फक्त पाच वर्षाची सोबती आहे.' काकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पाहिलेली सर्व स्वप्ने पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडली परंतु काका डगमगले नाहीत. त्यांनी मनाशी ठरवले मी प्रारब्धापासून मागे हटणार नाही. मी विवाह मोडणार नाही. ठरल्याप्रमाणे २७-४-१९९७ रोजी विवाह झाला. आज शुल्लकशा कारणावरून संसार मोडला जाणाऱ्यांनी काकांकडून खरोखर आदर्श घेतला पाहिजे.

काकांच्या वैवाहिक जीवनाला सरुवात झाली होती इतर चाकरमान्यांप्रमाणे काकांचाही संसार सुरू झाला होता. व्यवसायाच्या कामकाजात पुर्वी कष्ट करणारे दोन हात होते. ते पत्नीच्या रूपाने चार हात झाले होते. ६ महिन्यांचा कालावधी निघून गेला होता. माघारी आलेले सुख आता परतीच्या प्रवासाला जायला पाहत होते अवघ्या ६ महिन्यातच पत्नीच्या आजारपणाला सुरवात झाली. काकांना त्या सद्‌गृस्थाचे शब्द आठवले. परंतु काकांनी पत्नीची साथ सोडली नाही. त्यातून त्या बऱ्यापैकी सुधारल्या आणि २७-५-२००० रोजी काकांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. दुःख विसरायला पुत्र सुजयच्या रूपाने पती-पत्नीला कारण मिळाले. काही दिवसात काळाचे फासे पुन्हा उलटे फिरायला सुरवात झाली. काकांच्या पत्नीचे आजारपण वाढतच गेल. १-२ हजार नव्हे तर त्यावेळी हाती नसतानाही काकांनी पावणे दोन लाख रूपये खर्च करून पत्नीला वाचविण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले परंतु दैवापुढे कोणाचे चालत नाही. १४-४-२००१ रोजी काळाने अवघ्या ११ महीन्यांच्या सुजयच्या (काकांचा मुलगा) डोक्यावरील आईच्या मायेचे छत्र अक्षरक्षः ओरबाडून नेले. आई हे शब्द कानी पडण्याच्या आधीच त्या माऊलीने जगाचा निरोप घेतला होता.

पुन्हा जैसे थे स्थिती सुरू झाली. जण् पाहुणचाराला आलेले सुख दोन दिवस राहीले आणि निघुन गेले. पत्नीच्या आजारपणात कर्जाचा डोंगर वाढलेला. यात काका फार खचून गेले. कर्जदारांची दारावर रीघ लागायला लागली. कोणाकडे मदत मागावी तर आपले असे कोणीच नव्हते. शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी धडपडणारे काका पुन्हा शुन्यावर येऊन पोहोचले होते. नैराश्येतून खचून गेलेल्या काकांच्या मनात आता नको त्या विचारांनी खळबळ माजवायला सुरवात केली. बस आता आपण आपले जीवन संपवायचे असा विचार काकांच्या मनात येतो न येतो तोच त्यांच्या अंतरमनाने हाक दिली. झाले संपले एवढ्यातच हार मानली प्रसंगाला कंटाळून एवढ्यातच जीवन संपवायला निघालास तर तू परमार्थ काय करणार? परमार्थ म्हटल्यावर काकांच्या समोर सर्व गावचे चित्र उभे राहीले. परंपरागत आपल्या घराण्याकडून चालणारे कार्य हे सारे त्यांना आठवले आणि पुन्हा श्री देव गावडेबाबाचे नाव घेऊन ते जोमाने आपल्या कामाला लागले.

नव्याने पुन्हा व्यवसाय उभारायला सुरवात केली एका फंडातून ५ टक्के व्याजदराने १०,००० रक्कम घेतली व व्यवसायात गुंतवली. हळुहळु पुन्हा व्यवसाय प्रगतीपथावर येऊ लागला. यात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खूप साथ दिली. या काळात पहाटे ५ वाजता उठुन काकांनी भाजीचाही व्यवसाय केला. तर हळुहळु स्वतः कोकणमहोत्सव भरवायला सुरवात केली. यासाठी व्यापारी वर्गाला एकत्र करणारे मध्यस्थी दलाल यांची मर्जी सांभाळणे यासारख्या अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागत. कोकण महोत्सव म्हणजे विंचवाचे बिन्हाड असते. आज या गावी तर उद्या दुसऱ्या गावी. यावेळी काका स्वतः माल वाहतुक करत. या क्षणाची आठवण झाली की काका गंमतीने म्हणतात, " रात्री मी राजा असे तर सकाळी डोक्यावर बोजा असे याचाच अर्थ असा की रात्री स्टॉलचे मालक असणारे काका सकाळी मालाचा डोक्यावर बोजा घेऊन हमालीही करत असत.

काकांनी पुर्ववत नव्याने आयुष्याची सुरवात केली होती अशातच एके दिवशी त्यांचा राजेश सुतार नावाचा मित्र भेटला ज्याने काकांचे जीवन जवळुन पाहिले होते. त्याने काकांना भक्ती मार्गाबद्दल सुचविले. परंतु काकांनी त्यास प्रथम नकार दिला कारण संसारीक अडीअडचणींनी ग्रासलेल्या लोकांना समाजातील भोंदुबाबा फायदा उठवतात व फसवणुक करतात. या अंधश्रद्धाविषयावर काकांना मुळातच अतिशय चीड होती. काहीही झाले तरी त्यांची कुलदैवत श्री गावडोबावर त्यांची दृढ विश्वास होता. परंतु श्री. सुतार यांच्या आग्रहाने काका त्या उपासनेला जाऊ लागले. हळुहळु काकांच्या लक्षात आले की उपासना मार्गातून मन शांत आणि सतेज बनत जाते. प्रारब्धाचे भोग भोगण्याची शक्ती निर्माण होते आणि प्रारब्ध सुखाने भोगता येते. त्यांना त्या ठिकाणची निःस्वार्थ सेवा फार आवडली. त्याचवेळी काकांनी स्वामी नावाची कास धरत १९-७-२००५ रोजी स्वामी मार्गात पदार्पण केले. दिवसेंदिवस ते या काळात काकांनी श्री साटम महाराज, श्री भालचंद्र महाराज, श्री गगनगिरी महाराज यांची चरित्रे वाचली व ती आचरणात आणली. आता एका सामान्य माणसांची एका असामान्य सत्पुरूषाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती.

एका वेगळयाच विचारांनी काकांना प्रेरित केले होते. जीवनात अनेक चढउतार आले. तरीही काकांनी किंवा गावडे कुटुंबियांनी आपले परंपरागत चालत आलेले जनसेवेचे कार्य सोडले नव्हते. काकाही कधी मुंबई तर गावीही येऊन या कार्यात सहभागी होत. असेच नोव्हेंबर २००६ रोजी काका गावी आले होते. नरकचर्तुदशीचा दिवस होता. काकांना आज सत्पुरूषाच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. त्याचवेळी काकांना कोणीतरी सांगितले की आंदुर्ले येथे श्री नामदेव महाराज नावाचे संत राहतात. काकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या दर्शनाला गेले. काका तेथे पोहचण्या अगोदरच नामदेव महाराज कुणा आपल्या एका भक्ताला म्हणाले की, " कुणीतरी माडाच्या वाडीतुन येता" काका तिथे गेले तेव्हा महाराज आंघोळ करीत होते. काकांना पाहताच महाराजांनी भक्तांना काकांना प्रसाद देण्यास सांगितले. त्यांनी काकांना काजू कतरीचा प्रसाद दिला व नंतर स्वतःच्या चहातील अर्धा चहा काकांना दिला. थोड्या वेळाने महाराज रिक्षात बसले व काकांना म्हणाले, " भिकुकडे ये काकांना अर्थ उमगेना. परंतु काका काही वेळा त्या नावाचा शोध घेत महाराजांच्या शोधार्थ फिरत राहीले. शेवटी कुडाळला भिकु भोकटे नावाच्या गृहस्थाकडे महाराज सापडले. काकांना दर्शन घेताच महाराज उद्‌गारले, " जा तुझो देव तुका गावलो " श्री. नामदेव महाराज यांच्या वाणीने काकांच्या शरीरात एक नव चैतन्य निर्माण झाले.पुन्हा काकांनी मुंबईकडे प्रस्थान केले. पुन्हा तेच पोटासाठी खटपट सुरू झाली. व्यवसायाची व्याप्ती बऱ्यापैकी वाढली होती. परंतु काकांचे अंर्तमन त्यात रमत नव्हते त्यांना वेगळेच विचार भेडसावत होते. त्याचवेळी काकांनी ठरवले अध्यात्मासाठी जनसेवेसाठी आता हे शरीर झिजवायचे. २००७ रोजी काकांनी मुंबई येथील व्यवसाय भाच्याच्या हाती सोपवून आपल्या अध्यात्म प्रवासाला सुरवात केली. ज्याप्रमाणे श्री दत्तगुरूंनी आपल्या जीवनात २४ गुरूमानले त्याप्रमाणे काकाही आपल्या अध्यात्माच्या प्रवासात प.पू. साटम महाराज यांचे दर्शन घेतात. तसेच जीवनात प्रवासात लाभलेल्या प.पू भालचंद्र महाराज, प.पू गगनगिरी महाराज, प.पू. नामदेव महाराज, प.पू .पांडुरंगशास्त्री आठवले, सद्‌गुरू वामनराव पै, प.पू काकाश्री महाराज (सद्‌गुरू श्री भाऊ महारांजाचे शिष्य) झोपेदादा महाराज, घोसाळकर महाराज यांना आपल्या गुरूस्थानी मानले.

श्री देव गावडोबाच्या आशिर्वादाने काकांनी स्वतःच्या व चुलते रविंद्र गावडे यांच्या घरात मार्गदर्शनाला सुरुवात केली. सुरवातीपासून अनेक दुःखी कष्टी लोकांची काकांच्या घरी ये-जा असायचीच परंतु काकांच्या निस्वार्थी मार्गदर्शनामुळे ती अधिकच वाढत होती. पुढे काकांनी व गावातील मानकरी यांनी श्री देव गावडोबाचा कौल घेऊन काकांनी स्वखर्चाने २००७ रोजी श्री स्वामी समर्थ मठ बांधला. २००९ रोजी स्वामी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मठातील पहिली गुरूपोर्णिमा आली. गावकरी व भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने ती साजरी करण्याचे योजिले. त्याच वेळी सर्वांच्याच मनात एक वेगळीच संकल्पना आली व वंदनीय काकांचा पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला.

श्री देव गावडोबाच्या आशिर्वादाने हजारो भाविक, मानकरी, गावकरी यांच्या साक्षीने संतोष मुंडले या पुरोहितांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने काकांची पाद्यपूजा करण्यात आली. त्याचबरोबर मंत्रघोषाच्या गजरात महादेव भिकाजी गावडे यांचे मठाधिपती परमपुज्य सद्‌गुरू श्री गावडेकाका महाराज असे नामकरण करण्यात आले तेव्हापासून भक्तजनांनी काकांना 'काका' या संज्ञेने हाक मारण्यास सुरवात केली.

त्या दिवसापासून काकांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अविरतपणे त्यांनी स्वतःला जनकार्यासाठी वाहून घेतले. अध्यात्मातील अधिकारी पुरूषाने स्वतः मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न न करता रंजल्या-गांजल्यांच्या सेवेसाठी जीवन खर्ची कसे करावे हे काकांकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येते. काका ही आता एक व्यक्ती राहीलेली नाही. ती एक चालती बोलती संस्थाच आहे. अंधश्रद्धेला थारा नसल्यामुळे काकांच्या कार्यात अनेक बुद्धीजीवी मंडळी सामील झाली आहेत. बाह्य अवडंबर करून समाजाला फसविणाऱ्या बुवांची संख्या काही कमी नाही. परंतु काकांनी अशा बुवाबाजीला, अंधश्रद्धेला गाडून टाकले आहे. त्यांचा भक्तीमार्ग हा पारदर्शक आहे. दुःखी, कष्टी जीवांना चमत्कार करून दाखवून संभ्रमावस्थेत ठेवण्याचे कार्य ते कधीच करत नाहीत. काकांचे कार्य हे अनुभवसिद्ध असते.

काका आपल्या कार्याबद्दल कुणाकडूनच काही घेत नाहीत. निस्वार्थ भावनेने ते सतत जनांची सेवा करतात. त्यांना काही घेणे कधीच ठाऊक नाही उलट आपल्याकडे येणाऱ्याला ते सदैव भरभरून देतात. वंदनीय काका म्हणतात, " मी कधीच काही करत नाही मी अंगुठा छाप आहे.” ही त्यांची कमालीची विनम्रता आहे. काका प्रत्येकाला कष्टातून परमार्थ शिकवतात. आज त्यांच्या मसाले उद्योगात कितीतरी महिला व पुरूष काम करताना दिसतात. परंतु आजही काका स्वतः त्यांच्या बरोबरीने काम करतात. चहा - पाणी न घेता तासनतास एका जागेवर बसून लोकांच्या समस्यांचे निवारण करणारे, लोकांना मार्गदर्शन करणारे काका कधी चुलीवर कुळीथ भाजतात तर कधी लाडु वळताना दिसतात, तर कधी हातात झाडू घेऊन शौचालय साफ करतात. तरी काका कधी दमत नाहीत. कधीही पाहिले तरी त्यांची मुद्रा नेहमी हसत आणि प्रसन्न असते.

अध्यात्म क्षेत्रात उच्चस्थानी असणाऱ्या काकांच्या ठायी मीपणाला तीळमात्रही थारा नाही. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांमध्ये काका आपले होऊन जातात. अनेकांनी काकांना आपल्या गुरूस्थानी ठेवले आहे. परंतु काका अजूनही आपण विद्यार्थी असल्याचे सांगतात. ते प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकत असतात. काका निंदकालाही आपला गुरू मानतात. परंतु मी म्हणेन जर प्रत्येकाने काकांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले तर नास्तिकही आस्तिक बनेल आणि निंदकालाही काकांना आपले गुरू मानावेसे वाटेल. काकांकडे आलेला प्रत्येक जीव एक नवीन उमेद, नवीन आत्मविश्वास घेऊनच बाहेर पडतो. कारण काकांनी आयुष्यात जे जगले, जे अनुभवले त्यावरूनच आपल्या सेवकाला मार्ग दाखवितात आणि त्याला जोड असते ती स्वामी नामाची. ज्यांचे वयाच्या ७ व्या वर्षी बालपण संपले, तारूण्य अवस्थेत कष्टाच्या धगधगत्या निखाऱ्यात शरीर होरपळले, भातुकलीच्या खेळाप्रमाणे अवघ्या ४ वर्षातच संसार गळून पडला. पण परमेश्वरावरचा विश्वास कधीच नाही ढळला. तेव्हाच मठाधिपती परमपूज्य सद्गुरू श्री गावडेकाका महारांजासारखा सत्पुरूष घडला.

ज्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालता येत नाही, पर्जन्याच्या धारा मोजता येत नाहीत त्याप्रमाणे काकांच्या अफाट कार्याचा विस्तार शब्दात पकडायचा म्हणजे ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे, " की टिटिभु चाचुवरी माप सुथे सागरी" याचा अर्थ असा की, टिटवीने समुद्राचे पाणी चोचीने उपसण्याचा प्रयत्न करावा अशी अवस्था होण्याचा संभव आहे.

अशा या अविश्रांत श्रम करणाऱ्या युगपुरूषाला उदंड दीघायुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना.

गावडेकाका ते महंत गावडेकाका....

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा ।

या उक्तीप्रमाणे गेली अनेक वर्षे लोकांची निःस्वार्थी भावनेने सेवा करणारे असे आपले सर्वांचे लाडके प. पू. सद्‌गुरु श्री गावडेकाका महाराज मठाधिपती असणारे आपले काका आता श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज झाले आहेत. षट्दर्शन साधू समाज आखाडा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

महंत श्री मौनी महाराज कोकणच्या दौऱ्यावर आले. कोकणचा त्यांनी परिपूर्ण असा अभ्यास केला. वंदनीय काकांचे आणि त्यांनी स्थापित केलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास या संस्थेचे या भागातील सामाजिक कार्य त्यांना उल्लेखनीय वाटले. त्यांनी काकांची भेट घेतली. त्यानंतरच्या प्रत्येक कोकण भेटीत ते काकांच्या भेटीस आवर्जून आले. त्यांनी काकांना उज्जैन कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. काकांनीही त्यांच्या निमंत्रणाचे स्वागत करीत आपल्या सेवेकऱ्यांसह कुंभमेळ्यास भेट दिली. तेथील निःस्वार्थी, त्यागी भावनेने लोककल्याणार्थ ईश्वरसेवा करणाऱ्या साधू, संत महंतांचे दर्शन घेतले. हे दर्शन, ही साधू महंतांची समाजाची संस्कृती केवळ आपल्या आणि आपल्या सेवेकऱ्यांपुरतीच मर्यादित राहू नये तर समस्त कोकणवासियांना व माहराष्ट्राला त्याचे दर्शन घडावे अशी काकांची मनोमन इच्छा होती.

कोकणप्रांतासाठी साधू समाज संस्कृती, कार्ये फारच अनोळखी होती. मौनी महाराजांनाही कोकणात ही संस्कृती रुजवावी असे वाटत होते. काकांकडे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेहमीच जनकल्याणार्थ झटणाऱ्या दूरदृष्टीच्या काकांनी केवळ माझ्यासाठी किंवा माझ्या संस्थेसाठी असे कार्य न करता संपूर्ण जनाच्या कल्याणार्थ असे काहीतरी कार्य करा असा साधू समाज आखाड्यासमोर प्रस्ताव ठेवला. काकांची ही उदात्त भावना त्यांना खूपच भावली. त्याचबरोबर काकांनी या कार्यात आपल्याबरोबरच इतर संस्था, बुद्धीजीवी, समाजजीवी व्यक्तिंनाही सहभागी करून घेण्याची विनंती केली. काकांचा हा सांघिक, कल्याणकारी दृष्टीकोन आखाड्यासमोर मांडण्यात आला. सर्वांनी एकमताने तो मान्य केला आणि भारतातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिला जनकल्याण महायाग अर्थात लक्ष्मीनारायण महायाग करण्याचे निश्चित झले. सर्वांच्या सहकार्यातून आणि योगदानातून तो यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यासाठी किंवा या कार्याच्या पूर्वतयारीसाठी अनेक महंत, साधू, तपस्वी यांचे कोकणात येणे झाले. त्या प्रत्येक महंतांनी काकांची भेट घेतली. काकांना जवळून न्याहाळले. प्रेम, आदर, सत्काराची भावना काकांमध्ये ओसंडून वाहत आहे. काकांनी प्रत्येकाचे यथोचित स्वागत केले. प्रत्येकांच्या समोर नतमस्तक झाले.

हे सर्व कार्य संपन्न करण्यात काकांचा आणि त्यांच्या सेवेकऱ्यांचा फार मोठा वाटा होता. परंतु तीळमात्रही काकांनी त्याचे श्रेय आपल्याकडे घेतले नाही. कुठेही प्रसिद्धी नाही, नाव नाही की फोटो नाही. काकांच्या विनंतीला केवळ मान देऊन अनेक आखाड्याचे संत, महंत, असंख्य साधू या कार्यक्रमात एकत्र आले. अनेक संस्था एकत्र आल्या आणि जेव्हा एकी होते तेव्हा कल्याण हे सहज साध्य होते. काकांचे हे महान कार्य पाहून महंतानाही हेवा वाटला. आम्ही केवळ मोह, मायेचा त्याग करून ईश्वराची आराधना करतो परंतु काका स्वतःबरोबर इतरांनाही या आध्यात्मिक मार्गाला लावत आहेत आणि एक सात्विक समाजाची निर्मिती करीत आहेत. कोकणात अध्यात्म करणे म्हणजे कातळावरची शेती करण्यासारखी आहे आणि हे महान कार्य काका करीत आहेत असे उद्‌गार महंतांनी काकांबद्दल काढले.

काकांच्या या महान कार्याबद्दल आपण जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. साधु-समाजाचे कार्य काका निश्चितच पुढे नेतील याबद्दल शंका नाही. सर्वानुमते काकांना महंत श्री श्री १०८ ही उपाधी देऊ केली. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्याजोगा होता. प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी पुरुष सर्वांशी एकरूप होऊन जाणारे काका आज महंतांच्या गादीवर बसले होते. हे पाहून आनंदाने व प्रेमाने ऊर भरून येत होता. काकांच्याही डोळ्यात आपल्या सेवेकऱ्यांबद्दल अपार प्रेम दिसत होते. सिंधुदुर्गाला वंदनीय काकांमुळेच हा महंतपदाचा मान मिळाला. काकांकडून हे महान कार्य अविरतपणे चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

श्री श्री १०८ महंत प. पू. गावडेकाका महाराजांचे अध्यात्म लोककल्याणासाठी

अध्यात्माचे एक केंद्र म्हणन श्री श्री १०८ महत प. पू. गावडे काका महाराजांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी आज जन कल्याण्याचा रथ यशस्वीपण चालविण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.

कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी मधील सद्‌गुरु प. पू. गावडेकाका महाराज जनकल्याणाच्या विचाराने श्री श्री १०८ महंत पदाचे मानकरी ठरले आहेत. गरिब गरीब. गरीब या शब्दाच्या अर्थात गतीतरितसर बदल करत वंदनीय महादेव गावडे यांनी सद्‌गुरु गावडेकाका महाराज आणि आता श्री श्री १०८ महंत पीठाचे मठाधिपती म्हणून मिळविलेले अध्यात्माचे अधिष्ठान फारच अचंबित करून टाकणारे प्रसंग आहेत.

जीवन प्रवासातील गरीबीमधील शब्दाला गतीत रितसर बदल करताना आलेले प्रसंग खऱ्या अर्थाने अध्यात्मिक ओढ निर्मण करणारे ठरले. प. पू. स्वामी समर्थांचा मठ निर्माण करून श्री देव गावडोबा आणि स्वामी समर्थांची अविरत सेवा त्यांच्या जीवनाला आकार देणारी ठरली.

गरीबीतून जीवन प्रवास करताना कटु अनुभवाचे गाठोडे घेऊन त्याला जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणाची जोड देणाऱ्या सद्‌गुरु गावडे काका महाराजांचा जीवनप्रवास अलौकीक असाच आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असे म्हटले जाते. तसेच सदगुरु गावडेकाकांनी लहानपणापासून गरीबीचे घाव सोसले आणि त्यावर सकारात्मक, अध्यात्माची जोड देत केलेला प्रवास आधाराचे अधिष्ठान ठरला आहे.

श्री श्री १०८ महंत प. पू. गावडे काका महाराज यांनी अध्यात्माला लोक कल्याणाचा मार्ग म्हणूनच स्विकारला आहे. त्यांनी अध्यात्म्याच्या पलीकडे रोजगाराचे साधनही निर्माण केले आहे. त्या रोजगाराच्या संधी वाया जाऊ दिल्या नाहीत. त्यांनी गावातील बचतगटांना सोबत घेऊन रोजगाराचे मोठे दालन उभे केले आहे. त्यांचा मुलगा कॉलेज करत असतानाच त्याला रोजगाराचे शिक्षणही काका महारजांनी दिले आहे.

गरीबीवर मात करण्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात खाजे, खडखडे लाडू, कुळीथ पिठी, मसाले अशी अनेक उत्पादनांची बाजारात विक्री केली. त्या रोजगाराच्या संधी आजही सुरु आहेत. अध्यात्म आणि रोजगारात त्यांनी गल्लत केलेली नाही. मी एके दिवशी माड्याच्या वाडीत प. पू. स्वामी समर्थ मठात गेलो असता काका महाराजांचे अध्यात्मापलीकडील विश्व पाहण्याचा योग आला. त्यांनी रोजगार निर्मिती, सेंद्रीय शेती, गो-पालन, नक्षत्र उद्यान अशा विविधांगी कार्याची केलेली निर्मिती जवळून पाहता आली.

मुंबई सारख्या शहरात श्री श्री १०८ महंत प. पू. गावडेकाका महाराज यांच्या रोजगार केंद्रातून निर्माण झालेला फळप्रक्रिया उद्योग, मसाले, कुळीथ पिठी, सांडगे मिरची, आवळा सरबत, आवळा रस, आवळा कँडी, अननस सरबत, लसूण चटणी, तांदूळ, तांदळाचे पीठ अशा विविध दैनंदिन घरगुती उपयोगी वस्तु निर्माण करून रोजगाराचे साधन निर्माण केले आहे.

अध्यात्म सेवा देताना रोजगार केंद्रावर कोणताही परिणाम होणार नाही याची काका महाराजांनी दक्षता घेतली आहे. त्यांनी त्यात कोणतीही गल्लत केलेली नाही. प. पू. गावडे काकांनी अध्यात्माचे दर्शन नक्षत्र उद्यानातून घडविले आहे. प्रत्येकाच्या राशीचे वृक्ष असतात, ते नक्षत्र उद्यानात लावून संवर्धन केले आहे. राशीच्या नक्षत्राच्या वृक्षाखाली मंत्रसाधना केल्यावर थेट नक्षत्राकडे तुमची साधना पोहोचते असा एक अध्यात्मिक अनुभवदेखील ते कथन करतात. नक्षत्र उद्यानाशेजारीच सेंद्रीय शेती, केळी लागवड केली आहे तसेच विविध कृषी विषयक उत्पादने घेताना त्यांनी सेंद्रीय कलिंगड पीकदेखील घेतले आहे. त्याला मार्केटींगची संधीची जोडही त्यांनी दिली हे विशेष होय. या अर्थक्रांतीला भक्त, गावातील लोकांनी संधीच्या साधनेची साथ द्यावी हा त्यांचा एक लोककल्याणकारी विचार आहे.

कृषी क्षेत्रात सेंद्रीय पद्धतीने उत्पादनांना स्थान देण्याचा त्यांचा प्रयोग पाहता आला. त्यांच्या या संधीला अनेकांची साथदेखील आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हे प्रकल्प अध्यात्माप्रमाणे मार्गदर्शकच ठरणारे आहेत.

गो-मातेची प्रचंड आवड असणाऱ्या प. पू. गावडेकाका महाराजांनी सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फेडरेशनच्या गोविज्ञान प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन कृतीतून होते. माड्याच्या वाडीत गो-पालन करून त्यांनी गोमुत्र, गोबरापासून लोकांना फायदेही सांगण्याचा एक प्रयोग केला. देशी गाईच्या गोमुत्र व दुधाला असणारी मागणी व फायदेदेखील लोकांना सांगतात. गोमुत्रापासून मिळणारे फायदे सांगतानाच गोबरापासून शेणी बनविल्या. त्यात होम हवनला टाकण्यात येणाऱ्या तूप, धूप, कापूर पासून साऱ्या वस्तू टाकून त्या शेणी त्यांच्या गो-मातेची प्रचंड आवड असणाऱ्या प. पू. गावडेकाका महाराजांनी सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फेडरेशनच्या गोविज्ञान प्रशिक्षण वर्गात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन कृतीतून होते. माड्याच्या वाडीत गो-पालन करून त्यांनी गोमुत्र, गोबरापासून लोकांना फायदेही सांगण्याचा एक प्रयोग केला. देशी गाईच्या गोमुत्र व दुधाला असणारी मागणी व फायदेदेखील लोकांना सांगतात. गोमुत्रापासून मिळणारे फायदे सांगतानाच गोबरापासून शेणी बनविल्या. त्यात होम हवनला टाकण्यात येणाऱ्या तूप, धूप, कापूर पासून साऱ्या वस्तू टाकून त्या शेणी त्यांच्या गोशाळा सांभाळणाऱ्या मंडळींनी बनविल्या आणि बाजारात विक्रीही केल्या. या वस्तु बनविणाऱ्यांना प्रशिक्षणही घेण्यास पाठविले.

प. पू. गावडेकाका महाराजांचे अध्यात्माचे अधिष्ठान आज सर्वांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. पण इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी भोगलेले भोग आणि अध्यात्माच्या पलीकडे चरितार्थ चालविण्यासाठी लागणाऱ्या अर्थकारण रोजगाराकडे लक्ष दिले हे विशेष!

अशा या प. पू. गावडे काकांना परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य द्यावे हीच मनोमन प्रार्थना .....