भक्तजन हो अध्यात्म म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर आपण नेमके सांगू शकणार नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा अध्यात्माकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आपला महाराष्ट्र संत परंपरा म्हणून ओळखला जातो. या भूमीत अनेक संत, महात्मे होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जनसामान्यावर उमटविला. त्याचीच कास धरुन प्रत्येक माणसाने आपल्याला जो अध्यात्मिक मार्ग आवडेल, भावेल, मनःशांती मिळेल, ही इच्छा मनात ठेवून तो पंथ स्वीकारला. थोडक्यात काय तर आध्यात्मिक मार्ग कोणताही असो. शेवटी त्याचा मार्ग परमेश्वराकडे जातो.
परंतू परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आपण म्हणतो तेवढा सोपा नाही. त्यासाठी एक माध्यम असावं लागतं आणि ते माध्यम म्हणजे "सद्गुरु" मनुष्याच्या आयुष्यात पण या गुरुंना अनन्य साधारण महत्व आहे. आता हेच पहा की, आई-वडील हे आपले पहिले गुरु. त्यानंतर आपण जे शिक्षण घेतो ते शैक्षणिक गुरु, ज्ञानदान देणारे, त्यानंतर आपण जे उदरनिर्वाहासाठी कर्म करतो (नोकरी अथवा व्यापार) यातही आपणांस गुरुची आवश्यकता भासते. म्हणजेच काय तर गुरुशिवाय विद्या नाही असा समज आहे तो अगदी बरोबर आहे आणि सर्वात शेवटी म्हणजे आध्यात्मिक गुरु जे आपल्या जीवनाच्या वाटेवर सतत आपल्याबरोबर सावलीसारखे उभे राहून योग्य दिशा दाखवितात ते.
मनुष्याने आपल्या आयुष्यात गुरुदिक्षा घ्यावी अथवा नाही ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे. परंतू गुरुविणा आयुष्यात तरणोपाय नाही हे सुद्धा विसरता कामा नये. म्हणुन जीवनात गुरूचे स्थान किती महत्वाचे आहे हे आपल्याला कळते. उपरोक्त विषयाला अनुसरून आमचे आध्यात्मिक सद्गुरु प. पु. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचा परिचय तसेच आध्यात्मिक प्रवास याबद्दल थोडीशी माहिती ...
अत्यंत गरीब कुटुंबात कोकणात मु. माड्याची वाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे जन्म झाला. आई-वडील शेतकरी असल्याने त्यावरच उदरनिर्वाह होत होता. या परिस्थितीत शेतात काम करुन अथक मेहनतीने शिक्षण घेतले व नंतर मुंबईत येणे झाले. मुंबईत मिळेल ते काम करुन नोकरी केली. पण नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यांना व्यवसाय करण्यात जास्त रस होता व त्याप्रमाणे त्यांनी नोकरी सोडून आपले लक्ष व्यवसायात केंद्रित केले व छोटे व्यवसाय करत करत त्यांनी नंतर स्वतः चा कोकणातील उत्पादनांचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी तो व्यवसाय सुरु केला व नेटाने पुढे चालू ठेवला. त्यातही बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले त्यावर मात करत त्यांनी व्यवसाय वाढविला.
हे करत असताना त्यांच्या घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे आणि त्या वातावरणात लहानाचे मोठे झाले असल्याने, ते श्री स्वामी समर्थ मठात जाऊ लागले व तेथे जप, उपासना, ध्यानधारणा करू लागले. ते इतके त्या मार्गात एकरुप झाले की, त्या गोष्टीचा जणू त्यांना ध्यासच लागला व त्यानंतर त्यांनी निश्चय केला की, समाजातील गरीब, दिन-दुबळे, कष्टकरी यांना एकत्र आणून भगवंताच्या नामाची गोडी लावावी जेणेकरून त्यांचा व त्यांच्या कुटुंबियाचा उद्धार होईल असे काहीतरी कार्य आपल्या हातून घडावे म्हणून त्यांनी सन २००७ साली गावी श्री देव गावडोबा-कलेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना मु. माड्याची वाडी येथे केली. त्याला उत्तम प्रतिसाद भाविकांनी दिला व भाविकांची संख्या वाढू लागली. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले व आपल्या काही मित्रमंडळींजवळ आपल्या आध्यात्मिक कार्याबद्दल चर्चा करुन त्यांनी प्रथम घाटकोपर येथे श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र स्थापन केले व काही दिवस येथे राहून परत माड्याची वाडी येथे आपल्या गावी गेले. तेथे येणाऱ्या भाविकांना ते मार्गदर्शन करू लागले. त्याचा बऱ्याच भाविकांना अनुभव आला. माड्याच्या वाडीत येणाऱ्या भाविकांची संख्या आता वाढू लागली.
परंतू घाटकोपर येथे स्थापन केलेल्या उपासना केंद्रात देखील भाविकांची संख्या वाढू लागली व ते श्री गावडेकाका यांचे दर्शन आम्हास केव्हा होईल याची विचारणा करु लागले. या केंद्रात सेवा देणारे सर्वजण विचारात पडले की, यांना नेमके काय उत्तर द्यावे. या सर्व गोष्टींची कल्पना त्यांनी गावडेकाकांना दिली व विनंती केली की, आपण एकदा मुंबईत येऊन त्यांना मार्गदर्शन करावे. त्या विनंतीचा मान राखून गावडेकाका मुंबईस आले व येथील येणाऱ्या भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले. आता खऱ्या अर्थाने त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरु झाली. कधी मुंबई तर कधी कुडाळ असे त्यांचे येणे जाणे सुरु झाले. गावीसुध्दा परिस्थिती काही वेगळी नव्हती. हिच परिस्थिती असल्याने त्यांना दोन्ही ठिकाणी यावे लागत होते.
मुंबईत घाटकोपर उपासना केंद्रात मुंबई उपनगर, ठाणे, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर येथून भाविक येऊ लागले. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती व उपासना दर गुरुवारी सायं. ७.३० वा. होत असल्याने भाविकांची गर्दी वाढू लागली.
श्री गावडेकाकांचा मुळ उद्देश कुळधर्म व कुळाचार असल्याने भाविकांना त्यांचा चांगला लाभ होत होता. मुंबईत आता भाविकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे गावडे काकांचे मुंबईत येणे वाढले. त्यात त्यांनी आपला व्यवसाय गावी सुरु केल्याने व्यवसाय व अध्यात्म अशी दुहेरी भूमिका ते समर्थपणे बजावत होते. सन २००९ मध्ये त्यांनी श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास ही संस्था स्थापन केली. मुंबईत व कोकणात खऱ्या अर्थाने हि संस्था कार्यरत झाली. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक उपक्रम सुरु केले. 'श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा' मुंबई व कोकणात त्यांनी सुरु केला व त्यास भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला.
मुंबईतील घाटकोपर येथे येणाऱ्या भाविकांनी संख्या वाढू लागल्यामुळे श्री गावडेकाका यांनी सन २००८ मध्ये दिवा येथे श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना केली. मुंबईतील हा पहिलाच मठ होता जेथे 'श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना' करण्यात आली. आज येथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे.
सन २००९ मध्ये प्रथमच भटवाडी घाटकोपर येथे कुळधर्म - कुळाचार या विषयासंबंधी संस्थेच्या वतीने भाविकांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्या मेळाव्यास श्री गावडे काकांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सन २६ ऑगस्ट २०१० साली पश्चिम मुंबईतून येणाऱ्या भाविकांना सोईचे जावे याकरिता सांताक्रुझ उपासना केंद्राची स्थापना श्री गावडेकाकांनी केली. सुरुवातीस एका भक्तगणाने आपली स्वत:ची जागा आरती व उपासनेकरिता उपलब्ध करुन दिली. कालांतराने येथेही भाविकांची संख्या वाढू लागल्यामुळे भाडेतत्वावर एक कार्यालय घेतले व तेथे आरती, उपासना सुरु झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा अगाध आहे. काही महिन्यांनी हि जागा सुध्दा अपुरी पडु लागली. तद्नंतर स्थानिक, सेवेकरी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने रामेश्वर विद्यालयाचे पटांगणात आरती, उपासना सुरु करण्यात आली. आता मात्र भाविकांचा संख्येचा ओघ वाढू लागला. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दोनशे पार कधी झाली हे कार्यकर्त्यांनाच कळले नाही. आता सेवेकरी यांची जबाबदारी वाढली. त्याप्रमाणे त्यांनीही गुरुवारी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली व आजतागायत ते चांगल्याप्रमाणे घेत आहेत.
श्री गावडे काकांचे आध्यात्मिक कार्य अगदी जोमाने सुरु होते. या दरम्यान कोकणातही भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे श्री गावडे काका यांनी दुरुन लांब पल्ल्याचा प्रवास करुन माड्याच्या वाडीत येथे तेवढे सोपे नव्हते. तसेच प्रवास साधनांची मर्यादा असल्यामुळे सावंतवाडी येथे श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र सुरु केले. जेणेकरुन तेथील येणाऱ्या भाविकांना ते सोईस्कर होईल आज तेथेही आसपासच्या परिसरातील भाविक आरती व उपासनेचा लाभ घेत आहेत.
त्यानंतर श्री गावडेकाकांनी मसदे तिठा, वडाचा पाट, ता. मालवण येथे तेथील स्थानिक भक्तगणाने आपली जागा श्री स्वामी समर्थ मठास उपलब्ध करुन दिली. या अगोदर छोट्याश्या जागेत आरती, उपासना होत होती. परंतु जागा उपलब्ध झाल्यानंतर माड्याची वाडी नंतर दुसरे स्वामी समर्थ मंदिर खऱ्या अर्थाने उभे राहिले. हे मंदिर उभारण्याकरिता स्थानिक सेवेकरी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले व काही वर्षाने हे काम पूर्णत्वास आले. तद्नंतर या मठाची व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सद्गुरु श्री गावडे काकाच्याहस्ते झाली. आज येथेही येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे.
कुडाळ, मालवण, सावंतवाडी, कणकवली येथून सर्व भाविक प्रथम माड्याच्या वाडीस येत होते. परंतू सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथे उपासना केंद्र स्थापन केल्यामुळे गावातील भाविकांना येणे सोपे होऊ लागले.
यानंतर सद्गुरु श्री गावडे काकांनी कणकवली उपासना केंद्र स्थापन केले. सध्या एका भाविकाने दिलेल्या जागेत या उपासना केंद्रात आरती, उपासना केली जाते. आज या केंद्रातही भाविकांची संख्या वाढत आहे.
या दरम्यान मुंबईतील सांताक्रुझ उपासना केंद्राने व तेथील सर्व सेवेकरी व भाविक यांच्या सहकार्याने २ वर्षापूर्वीच स्वतःची हक्काची जागा घेतली व अथक परिश्रम घेऊन ३ मजली इमारत उभी केली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री साटम महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना सद्गुरुच्या हस्ते करण्यात आली व आज या पवित्र जागेत नित्यनेमाने पूजा, आरती, जप, उपासना अखंडपणे केली जाते. तसेच विविध आध्यात्मिक उपक्रम, सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत येथे राबविले जातात. एकदा अवश्य भेट द्या. यानंतर सांताक्रुझ केंद्रात येणाऱ्या काही भाविकांच्या विनंतीनुसार सद्गुरुंनी मुंबईतील आणखी एका केंद्रास परवानगी दिली ते म्हणजे कांदिवली केंद्र, श्री स्वयंभू गणेश मंदिर येथे केवळ उपासना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आज येथे येणाया भाविकांची संख्या हळूहळू वाढत आहे.
कोकणाली दुर्गम भागातून प्रवासाने साधन नसतानाही येणारे भाविकांची संख्या वाढल्यामुळे श्री गावडे काकांनी सावंतवाडी- कारिवडे केंद्र स्थापन केले. एका भक्तगणाच्या घरी अंगणात ही आरती व उपासना सुरु आहे. सद्गुरुंनी दिलेला या मार्गाचा अवलंब करुन आपण सर्वांनी आपल्या जीवनाचे व इतरांच्या जीवनाचे सार्थक करावे ही स्वामी चरणी प्रार्थना..